छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मुकुंदवाडीतील अंबिकानगरात एका इमारतीत खोली भाड्याने घेऊन शेख सुलताना शेख मैनोद्दीन (वय ४५, रा. अंबिकानगर, गल्ली क्र. ८) ही चरस विक्रीचे रॅकेट चालवत होती. मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी (३१ ऑगस्ट) छापा मारून तब्बल १५ लाख रुपयांचे दीड किलो चरस आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
: चरसमाफिया शेख सुलताना अखेर गजाआड !; मुकुंदवाडीतील अंबिकानगरात घरावर छापा, चार एजंटांच्याही मुसक्या आवळल्या
मोहम्मद मुजम्मील मोहम्मद नजीर (वय २१, रा. रहेमानिया कॉलनी), लोमान ऊर्फ नोमान खान इरफान खान (वय २१, रा. रहेमानिया कॉलनी), मोहम्मद लईखुद्दीन मोहमद मिराजोद्दीन (वय २५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (वय १९, रा. कटकटगेट) अशी एजंटांची नावे असून, शेख सुलतानाकडून चरस घेऊन ते कॉलेज परिसरात विकायचे. सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुकुंदवाडी पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकाला अंबिकानगर येथील शेख सुलताना ही भाड्याच्या घरातून चरस विकत असल्याचे कळले. यानंतर सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, पोलीस अंमलदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, गणेश वैराळकर, अनिल थोरे, गणेश वाघ यांनी तिच्या घरावर छापा मारला. बराच वेळाने दार उघडल्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता पलंगाखाली चरसचा साठा केल्याचे आढळले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे करीत आहेत.
जप्त केलेले चरस उच्चप्रतीचे असून, तोळा आणि ग्रॅममध्ये पुड्या तयार करून ते विकले जायचे. १ तोळा चरस ८०० ते १००० रुपयांत विकले जात होते. एवढे मोठे चरस त्यांनी कुठून आणले, त्यांचे एजंट कोण, पुरवठादा कोण, हे तपासात समोर येईल. सुलताना ३ वर्षांपासून मुलासह अंबिकानगरमध्ये राहत होती. कुणाला संशय येऊ नये म्हणून मायलेक मिळेल ते काम करायचे. सुलताना रुग्णांची सेवा करायची, तर तिचा फरारी मुलगा मोबिन वाहनचालक आहे.