पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – खासदार संदिपान भुमरे
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
वैजापूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या डोळ्यात हतबलता आणि चिंता स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संदिपान भुमरे यांनी वैजापूर तालुक्यातील गोदावरी काठाजवळील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
तालुक्यातील हिंगोणी, कांगोणी, लाखगंगा, बाबतारा, पुरणगाव, बाभूळगाव गंगा, नांदूरढोक, सावखेड गंगा, वांजरगाव, भालगाव, डाग पिंपळगाव, नागमठाण, बाजाठाण, चेंडूफळ, इत्यादी गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार रमेश बोरनारे सर तसेच संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासनाचा दिलासा पोहोचावा, त्यांना न्याय मिळावा यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पार पाडली जाणार आहे. शेतकऱ्यांनी निराश न होता धीर धरण्याचे आवाहनही यावेळी खासदार संदिपान भुमरे यांनी केले.
नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले असून खासदार या नात्याने पाठपुरावा करत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला. तसेच एकही शेतकरी नुकसानग्रस्ताच्या पंचनामा शिवाय राहू नये असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना खासदार भुमरे यांनी दिले.