आमदारांची बदनामी, चार ‘यूट्यूब’ पत्रकारांना पाच दिवसांचा कारावास
आमदारांची बदनामी, चार ‘यूट्यूब’ पत्रकारांना पाच दिवसांचा कारावास
हक्कभंग विशेषाधिकारी समितीकडून चौकशी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
नागपूर : विधान परिषद सदस्य
अमोल मिटकरी यांची बदनामी केल्याप्रकरणात चार ‘यूट्यूब’ पत्रकारांना धक्का बसला आहे. विशेषाधिकार समितीने त्यांना पाच दिवसांच्या कारावासात पाठविण्याची शिफारस केली आहे.
सत्यलढा या यूट्यूब चॅनलने राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सदस्य अमोल मिटकरी यांच्याबाबत तथ्यहीन वृत्त प्रसारित केले होते. यामुळे मिटकरी यांची प्रतिमा मलिन झाली होती. संबंधित यूट्यूब चॅनलचे पत्रकार गणेश सोनावणे, हर्षदा सोनावणे, अमोल नांदुरकर, अंकुश गावडे व संपादक सतीश देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या
प्रकरणाची हक्कभंग विशेषाधिकार समितीद्वारे चौकशी झाली. समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘सत्यलढा’ यूट्यूब चॅनलवरून अमोल मिटकरी यांच्याबाबत खोटे व दिशाभूल करणारे आरोप करण्यात आले. यामुळे एका लोकप्रतिनिधीची राजकीय प्रतिष्ठा मलिन झाली असून हा विशेषाधिकारांचा भंग ठरतो. या प्रकरणात संपादकाने लेखी माफी मागितल्याने त्याच्यावर कारवाई न करण्याची शिफारस समितीने केली आहे. तर उर्वरित चारही जणांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जेव्हा विधिमंडळाचे सत्र सुरू असेल त्या कालावधीत त्यांना कारावासात पाठविण्यात यावे, अशी शिफारस समितीने केली आहे. जर या सत्रात कारावास झाला नाही तर पुढील विधिमंडळ सत्रात याची पूर्तता करण्यात यावी असेदेखील समितीने अहवालात स्पष्ट केले आहे.
