दैनिक शब्दमत | अपडेट
पंडित धीरेंद्र शास्त्रींकडून शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्रात संताप, पुण्यात जोडेमार आंदोलन
नागपूर प्रतिनिधी | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बागेश्वर धामचे स्वयंघोषित साधू धीरेंद्र शास्त्री (उर्फ धीरेंद्र गर्ग) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या विधानाविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत असून पुण्यात लालमहाल परिसरात आंदोलन छेडण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या निकालात समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचा ठोस ऐतिहासिक पुरावा नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु नव्हते, असेही नमूद करण्यात आले होते.
असे असतानाही धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात शिवाजी महाराज अनेक युद्धांनी थकले होते आणि त्यांनी आपली सत्ता रामदास स्वामींकडे सोपवली, असे विधान केले. या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या कार्यक्रमाला मोहन भागवत, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावरूनही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्याला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अशा वक्तव्यांना वेळीच आळा घालणे आवश्यक होते, अशी टीकाही होत आहे.
पुण्यातील लाल महाल येथे मराठा समाजाच्या वतीने धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणावर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “बाबांनी अध्यात्म सांगावे, इतिहासाची मोडतोड करू नये,” असे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही महाराष्ट्रात बागेश्वर बाबांवर बंदी घालण्याची मागणी केली.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या विधानाला ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे ठरवत शास्त्रींवर कारवाईची मागणी केली आहे. इतिहास अभ्यासकांनीही या विधानाला “भाकडकथा” म्हणत फेटाळून लावले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून इतिहासाच्या विकृतीकरणाला विरोध करण्याची भूमिका विविध स्तरांतून स्पष्टपणे समोर येत आहे.






