नदी, नाल्यांवरील अतिक्रमणे काढा – मनपा आयुक्त जी. श्रीकांत नदीची सीमा निश्चित करून रेखांकन करण्याचे आदेश
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क नारेगाव छ.संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर नदी व नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याची कारवाई सुरू करा, विशेषतः नारेगाव परिसरात नदीकाठावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने ते प्राधान्याने हटविण्यात यावीत, असे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सोमवारी (दि.३०) दिले. स्मार्ट सिटी कार्यालयात नालेसफाइच्या अनुषंगाने त्यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीत आयुक्तांनी विविध सूचना व निर्देश अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तानपुरे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, सचिन वायकर यांच्यासह विभागीय वॉर्ड अभियंते उपस्थित होते. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे १ एप्रिलपासूनच सुरू करा. नदीची सीमा
निश्चित करून तिचे रेखांकन करण्यात यावे. सीमा निश्चित करताना रेल्वेमध्ये वापरण्यात येणारे स्लीपर किंवा मजबूत खांब (पोल) वापरावेत, जेणेकरून ते सहजपणे काढता येणार नाहीत. तसेच शहरातील सर्व दहा झोनमध्ये नालेसफाईचे सूक्ष्म नियोजन करावे नालेसफाई करताना वरच्या टोकापासून खालच्या दिशेने सफाई करण्यात यावी. जेणेकरून गाळ साचण्याची समस्या टाळता येईल. मागील वर्षी पावसाळ्यात राहूल नगर, इटखेडा व नारेगाव या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने यावर्षी त्या समस्यांचे मूळ कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करा. भविष्यात पूरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. नालेसफाई दरम्यान दररोज किती मीटर सफाई झाली याचा अचूक अहवाल सादर करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला.






