३५०० किमी पाठलाग करून बिडकीन पोलिसांची थरारक कामगिरी; अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सुटका
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क, बिडकीन
पैठण : गुन्हे तपासातील चिकाटी, तांत्रिक कौशल्य आणि धाडस यांचा संगम दाखवत बिडकीन पोलिसांनी तब्बल ३,५०० किलोमीटरचा पाठलाग करून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची झारखंडमधून सुखरूप सुटका केली. या प्रकरणातील आरोपी विकास कार्तिक रविदास (वय २१, रा. कोडरमा, झारखंड) याला अटक करण्यात आली आहे.
बिडकीन परिसरातून २० मार्च रोजी सकाळी ९ वाजता एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
तांत्रिक विश्लेषणातून मुलगी झारखंड राज्यात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता कारवाईचा निर्णय घेतला. पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश खंडागळे आणि सचिन आगलावे यांच्या पथकाने रेल्वेऐवजी खाजगी वाहनाने जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड अशा पाच राज्यांच्या सीमा पार करत पथकाने कोडरमा जिल्हा गाठला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३० मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता सापळा रचून मुलीची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक करण्यात आली.
यानंतर आरोपीला कोडरमा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ७२ तासांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर आरोपीला महाराष्ट्रात आणण्यात आले असून सध्या त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
“कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही” – पोलिस अधीक्षक
या कारवाईबाबत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, “गुन्हेगार कितीही दूर पळाला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे या कारवाईने सिद्ध झाले आहे.”
दरम्यान, मुलीची सुखरूप सुटका झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे पेढे भरवून आभार व्यक्त केले.








