हातात कॅरीबॅग दिसली की ५०० रुपये दंड!
नागरिकांसह विक्रेत्यांवरही कारवाई; महापालिकेची विशेष पथके शहरभर सक्रिय
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, ता. २४ : भाजी किंवा किराणा घेताना प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे. शहराला प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलली असून, कॅरीबॅग वापरताना आढळल्यास नागरिकांनाही थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. विक्रेत्यांसोबतच ग्राहकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
महापालिकेच्या विशेष पथकांनी भाजीमंडई, मुख्य बाजारपेठा आणि किराणा दुकाने येथे तपासणी मोहीम तीव्र केली आहे. पथकातील कर्मचारी ग्राहकांवरही लक्ष ठेवून असून, हातात प्लॅस्टिक कॅरीबॅग दिसताच दंडाची कारवाई केली जात आहे.
तीन दिवसांत ११ हजार किलो प्लॅस्टिक जप्त
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गेल्या तीन दिवसांत मोठी कारवाई करण्यात आली. या कालावधीत तब्बल ११ हजार किलोहून अधिक प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, सुमारे ४० लाख प्लॅस्टिक पिशव्या वापरात येण्यापूर्वीच रोखण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे.
उत्पादनापासून वापरापर्यंत बंदी
राज्य शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या आदेशानुसार राज्यात सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी आहे. यामध्ये प्लॅस्टिक ताटे, चमचे, स्ट्रॉ, थर्माकोल साहित्य आणि पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा समावेश आहे. या आदेशाची आता महापालिका काटेकोर अंमलबजावणी करत आहे.
नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबतच गरज पडल्यास फौजदारी गुन्हेही दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. “कोणताही दबाव आला तरी कारवाई थांबवू नका,” अशा स्पष्ट सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन : कापडी पिशवी वापरा
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक कॅरीबॅगऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कापडी पिशव्या टिकाऊ असून वारंवार वापरता येतात, तर कागदी पिशव्याही स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
प्लॅस्टिकचे घातक परिणाम
प्लॅस्टिकमुळे पर्यावरणासह प्राणीजीवनालाही मोठा धोका निर्माण होत आहे. फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्याने त्यांच्या मृत्यूच्या घटनाही घडत आहेत. तसेच नाल्यांमध्ये प्लॅस्टिक अडकल्याने पाणी तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्लॅस्टिकमुक्त शहर घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.








