छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोंदणीचा मोठा डाव उघडकीस
सरकारी जमिनींच्या भूखंडांची उघडपणे विक्री; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुख्य संपादक आजमत पठाण
प्रतिनिधी | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क | छत्रपती संभाजीनगर
शहरात बनावट नोंदणी आणि फसव्या भूखंड विक्रीचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, सरकारी जमिनींवर बेकायदेशीरपणे लेआउट तयार करून नागरिकांची सर्रास फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही भूखंड दलाल आणि टोळ्या बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमिनींचे विभाजन करून त्यांची खोटी नोंदणी करत आहेत. यामुळे खरेदीदारांना मालकी हक्काचा भ्रम निर्माण केला जात असून, लाखो रुपयांना भूखंड विकले जात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी कोणतीही वैध परवानगी किंवा दस्तऐवज नसताना संपूर्ण लेआउट उभे करण्यात आले आहेत.
पडेगाव, जटवाडा, पैठण रोड, चिकलठाणा, सुंदरवाडी, दौलताबाद, आब्दीमंडी आणि नारेगाव या भागांमध्ये सरकारी जमिनींवर अवैध प्लॉटिंग करून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या गंभीर प्रकाराकडे संबंधित महसूल विभाग, नोंदणी कार्यालय आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. इतका मोठा गैरप्रकार सुरू असतानाही ठोस कारवाईचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “या फसवणूक करणाऱ्यांना कोणाचे संरक्षण आहे?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, फसव्या नोंदणीमध्ये सहभागी असलेल्या टोळीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सरकारी जमिनीवरील सर्व बेकायदेशीर लेआउट तात्काळ हटवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार आणि या बेकायदेशीर प्रथेला आळा घालण्यासाठी कोणती ठोस कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








