मृतदेह कोणता कुणाचा? नाशिकमधील हृदयद्रावक अपघाताने मन हादरले
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क :नाशिक
दिंडोरी (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. स्नेहसंमेलनासाठी आलेल्या दरगोडे कुटुंबातील ९ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरगोडे कुटुंबीयांची कार रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरातील एका वळणावरून जात असताना कडे नसलेल्या विहिरीत कोसळली. संबंधित विहिरीभोवती कोणतेही मजबूत संरक्षक कडे किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे चालकाला विहीर लक्षात आली नाही आणि हा भीषण अपघात घडला.
या अपघातात कारमधील सर्व ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणेही अत्यंत कठीण झाले.
अंत्यविधीच्या वेळी परिस्थिती अधिकच हृदयद्रावक झाली. “कोणता मृतदेह कुणाचा?” असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला होता. नातेवाईकांचा आक्रोश आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून संपूर्ण वातावरण शोकमग्न झाले होते.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विहिरीभोवती योग्य सुरक्षा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, याबाबत चौकशीची मागणी होत आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे दिंडोरी शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.








