क्षिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा! गाडेगव्हाण जि. प. शाळेत पहिली ते पाचवीचे विद्यार्थी एकाच खोलीत; छताचे पत्रे उडाले, तरीही जालना जिल्हा परिषद ‘कुंभकर्णी’ झोपेत
शाळा दुरुस्तीचा ग्रामपंचायतीचा ठराव वर्षभरापासून जि.प. मध्ये खातोय धूळ; ZP ‘सीईओ’ साहेबांनी तात्काळ लक्ष घालून नवीन खोली व अतिरिक्त शिक्षक देण्याची गावकऱ्यांची संतप्त मागणी.
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश
“खेड्यापाड्यातील मुले शिकली पाहिजेत” अशा मोठ्या वल्गना शासन पातळीवर केल्या जातात, मात्र जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था पाहिल्यास राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे विदारक चित्र समोर येते. शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून, छताचे पत्रे गायब झाले आहेत. सर्वात भयंकर बाब म्हणजे, इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना नाईलाजाने एकाच खोलीत दाटीवाटीने बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. प्रशासनाला ग्रामपंचायतीने ठराव देऊनही वर्षभरापासून तो जि. प. मध्ये धूळ खात पडून असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप खदखदत आहे.
छताला पत्रे नाहीत, एकाच खोलीत ५ वर्ग!
गाडेगव्हाण जि.प. शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शाळेच्या वर्गखोल्यांची मोठी दुरावस्था झाली असून, छतावरील पत्रे पूर्णपणे खराब होऊन निकामी झाले आहेत. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी साधे छतही शाळेला उरलेले नाही.
खोल्यांची कमतरता आणि पडझड झाल्यामुळे सध्या पहिली ते पाचवीचे सर्व विद्यार्थी एकाच वर्गखोलीत बसत आहेत. एकाच खोलीत पाच वर्गांचे विद्यार्थी बसल्याने गोंधळ उडतो, मग शिक्षकांनी शिकवायचे कसे आणि विद्यार्थ्यांनी समजून कसे घ्यायचे? असा संतप्त सवाल पालक करत आहेत. हा निष्पाप विद्यार्थ्यांच्या जिवाशी आणि भविष्याशी चाललेला खेळ आहे.
जि. प. प्रशासनाचा भोंगळ कारभार; वर्षभरापासून ठराव खातोय धूळ
शाळेच्या या भयानक दुरावस्थेबाबत गाडेगव्हाण ग्रामपंचायतीने रीतसर ठराव घेऊन तो दुरुस्ती आणि नवीन मंजुरीसाठी जिल्हा परिषद, जालना यांच्याकडे पाठवला आहे. मात्र, या गोष्टीला एक वर्ष उलटून गेले तरी जि.प. च्या अधिकाऱ्यांनी याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. ग्रामपंचायतीचा हा महत्त्वाचा ठराव जिल्हा परिषदेच्या कार्यालयात केवळ धूळ खात पडला आहे. अधिकाऱ्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच आज गावातील चिमुकल्यांना मोडकळीस आलेल्या एकाच खोलीत जीव मुठीत धरून बसावे लागत आहे.
वाढती पटसंख्या, शिक्षकांची वानवा; तिसऱ्या शिक्षकाची नितांत गरज
एकीकडे शाळेला बसायला जागा नाही, तर दुसरीकडे शाळेची पटसंख्या (विद्यार्थ्यांची संख्या) जास्त आहे. सध्या या शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत. पटसंख्येच्या प्रमाणानुसार या शाळेसाठी तातडीने अजून एका (तिसऱ्या) शिक्षकाची गरज आहे. मात्र, याकडेही शिक्षण विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. ZP ‘सीईओ’ साहेबांना गावकऱ्यांचे थेट साकडे आणि इशारा
जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) साहेब यांनी या गंभीर प्रकारात स्वतः लक्ष घालावे, अशी आर्त हाक गाडेगव्हाणच्या गावकऱ्यांनी दिली आहे.
चौकट
गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
१) धूळ खात पडलेल्या ठरावाला तात्काळ मंजुरी देऊन शाळेच्या नवीन खोल्यांचे काम सुरू करावे.
२) विद्यार्थ्यांच्या वाढत्या पटसंख्येनुसार शाळेत तात्काळ एका नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी.
“जर जिल्हा परिषदेने या रास्त मागण्यांकडे त्वरित लक्ष दिले नाही, तर गाडेगव्हाणचे ग्रामस्थ मुलांसह जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढतील,” असा कडक इशाराही गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. आता तरी जि. प. प्रशासन झोपेतून जागे होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








