लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा व मोफत वाळू उपलब्ध करून द्या; जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | दि.८
ग्रामीण आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच अतिक्रमित जमिनीवरील घरे नियमानुसार नियमित करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी आणि घरकुल बांधकामासाठी प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी Vinay Gowda G. C. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष Avinash Galande Patil, मुख्य कार्यकारी अधिकारी Minnu P. M., समाजकल्याण सभापती Balaji Sonatakke, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणेचे Vasudev Solanke, निवासी उपजिल्हाधिकारी Janardan Vidhate यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ग्रामीण आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांची यादी, जागेचे तपशील, आराखडे आणि आवश्यक कागदपत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे घरकुल मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शासकीय अथवा गायरान जमिनीवरील घरांबाबत शासन निर्णयानुसार नियमानुकूल कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वनविभागाच्या अखत्यारितील जमिनींसाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देशही देण्यात आले.
घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू जवळच्या शासकीय वाळू डेपोतून उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व ग्रामविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी आणि येणाऱ्या अडचणी त्वरित दूर कराव्यात, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट केले.
शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित प्रस्तावांतील त्रुटी दूर करून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. जिल्ह्यातील आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी मोहीम स्वरूपात काम करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांनी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम. यांनी ‘नशामुक्त अभियान’, ‘बालविवाहमुक्त संभाजीनगर’ आणि ‘कुपोषणमुक्त बालक’ या उपक्रमांमध्ये पोलीस, उत्पादन शुल्क, महिला व बालविकास, महसूल आणि ग्रामविकास विभागांनी सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात घरकुलासाठी मंजूर झालेल्या गायरान जमिनींचे ग्रामपंचायतींना हस्तांतरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम. यांच्याकडे सुपूर्द केले.









