गणेशपूर फाटा रस्त्याची दुरवस्था; चिखलमय मार्गामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. मुलींना चिखल तुडवित काढावी लागते वाट…
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी गट ग्रामपंचायत वार्ड सहा मौजे गणेशपूर ते मुख्य फाट्यापर्यंतचा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता अक्षरशः चाळणी झाला असून, या मार्गाची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले असून , शाळाकरी मुलींना चिखल तुडवित काढावे लागते वाट प्रशासनाच्या दुर्लक्ष कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांना चिखलातून करावा लागतो प्रवास
गावात पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा असली तरी, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दररोज टेंभुर्णी येथे जावे लागते. मात्र, गणेशपूरकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने गावात कोणतीही सार्वजनिक बस किंवा खासगी वाहने येण्यास तयार नाहीत. रस्ता खराब असल्याने शाळा भरण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना रस्त्यावरील चिखलातून आणि गटारातून वाट काढत टेंभुर्णी गाठावी लागते. या बिकट परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाचा धोका निर्माण झाला असून, त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे.
फक्त उद्घाटनाच्या पाट्या, रस्ता गायब’
याबाबत अधिक माहिती घेतली असता, धक्कादायक बाब समोर आली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन बराच कालावधी उलटला आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्ता तयार करण्याऐवजी गावात फक्त उद्घाटनाच्या पाट्या लावून प्रशासनाने बोळवण केली आहे. प्रत्यक्ष रस्ता मात्र जैसे थे असून, पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचे साम्राज्य बनला आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष.
रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे गणेशपूरच्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी आणि जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने आमची मुले शाळेत कशी जातील, हा मोठा प्रश्न आहे. उद्घाटनाच्या पाट्या लागल्या, पण रस्ता अजूनही कच्चाच आहे. लोकप्रतिनिधींनी आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून तातडीने रस्ता बनवावा,” अशी भावना संतप्त पालकांनी व्यक्त केली आहे. याकडे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी माजी उपसरपंच माधवराव अंधारे गजानन अंधारे यांच्या सह गावकऱ्यांनी केली आहे
कोटः आमच्या गावात भाजपाला शंभर टक्के मतदान होते, पण आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधि असणारे आमदार संतोष दानवे यांनी लक्ष द्यावे
आमच्या गावात फक्त पाचवी प्रयत्न शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी आम्हाला टेंभुर्णी, देऊळगाव राजा येथे जावे लागते.
आमची एकच विनंती आहे की, आमच्या भविष्यात शिक्षणासाठी तरी आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्यावी. माधवराव अंधारे माजी उपसरपंच








