जनआक्रोश महामोर्चात उसळला जनसागर; प्रशासनाची उडाली तारांबळ
उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवली नाही तर संविधान दिनी
दिल्लीकडे पायी कुच”-सिद्धार्थ शिनगारे*
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफ्राबाद प्रतिनिधी मोहम्मद बाईयाश
अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जाफ्राबाद येथे काढण्यात आलेल्या विराट जनआक्रोश महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणत्याही राजकीय पक्ष,संघटना किंवा नेत्याच्या आवाहनाशिवाय हजारो नागरिक स्वयंप्रेरणेने सहभागी झाल्याने जाफ्राबाद तालुक्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि शिस्तबद्ध मोर्चा ठरल्याची चर्चा होती.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातून निळे झेंडे, बॅनर,पोस्टर्स आणि पांढरी वेशभूषा परिधान केलेल्या आंदोलकांनी “जय भीम”, “जय संविधान” आणि “उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे निघालेल्या या जनसागराने प्रशासनासह नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, मोर्चाचे संपूर्ण नियोजन आणि शिस्त उपवर्गीकरण समन्वय समितीच्या स्वयंसेवकांनी प्रभावीपणे सांभाळली.
सभेपूर्वी प्रमुख मार्गदर्शक सिद्धार्थ शिनगारे,प्रा.डॉ.ह.नी.सोनकांबळे,दादासाहेब शेळके,अजय सरोदे,राजू थाटे,सिद्धार्थ सुरडकर आणि रुक्मिणीताई लोंढे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
वक्त्यांनी आपल्या भाषणातून उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवित संविधान,सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण करण्याची भूमिका मांडली. रुक्मिणीताई लोंढे यांनी काही भरकटलेल्या मातंग समाजातील बांधवांना म्हणाल्या मनुवादी विचारांची घाण डोक्यातून काढून टाका,त्या बुरसटलेल्या विचारांच्या लोकांच्या खांद्यावर निळा झेंडा पेलणारच नाही,माझ्या बापाने म्हणजे बाबासाहेबांनी दिलंय त्याची जाणीव ठेवा आणि आता तरी डोळे उघडा.. कारण तिथे तुमची आणि समाजाची अधोगती च होईल असे सुचविले आणि समाजातील मतभेद दूर करून आंबेडकरी विचारांभोवती एकत्र येण्याचे आवाहन केले.
सिद्धार्थ सुरडकर यांनी अन्यायग्रस्त समाजाच्या पाठीशी बौद्ध समाज सातत्याने उभा राहिल्याचे सांगितले.
राजू थाटे यांनी अरे,मांगो,मागो तो क्या मांगो जरा उससे हटके तो मांगो असे म्हणत राजु थाटे म्हणाले,वदडी,गोधडी,दवंडी आणि आंबेडकरवादी विचारांची कास धरून शिकाल तर टिकाल नसता कायमचं हूकालं.. म्हणत शिक्षण,संघटन आणि आंबेडकरी विचारांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
दादासाहेब शेळके यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर घटनात्मक प्रश्न उपस्थित करत,संविधानातील तरतुदींवर आधारित भूमिका मांडली.आणि सांगितले की,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या आर्टिकल १४१ नुसार जनतेच्या हक्काचे संरक्षण करण्याचं सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आहे,आणि ते च जर मोडण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करत असेल तर समाज काय करेल ? संविधानाच्या आर्टिकल १९ (अ) नुसार आम्ही आंदोलन करत असून सुप्रीम कोर्टाने आदेश देत असताना नैतिकतेचं भाण राखलं पाहिजे होतं असं सांगून मला सुप्रीम कोर्टाला विचारायचे आहे की ३९५ कलमा मध्ये उपवर्गीकरण करण्याची तरतूद कुठे आहे याचं उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाचा दिलेला निर्णय हा भारतीय संविधानाला छद देणारा आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो असं सांगितलं.
प्रा. डॉ. ह. नी. सोनकांबळे यांनी अनुसूचित जातींना मिळालेले आरक्षण हे ऐतिहासिक सामाजिक अन्यायाची भरपाई असल्याने समाजात फूट पाडणाऱ्या कोणत्याही निर्णयाचा घटनात्मक आणि सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
समारोपात लॉंग मार्चचे प्रमुख प्रणेते सिद्धार्थ शिनगारे यांनी भावनिक आणि आक्रमक भाषण करत सांगितले की, हा संघर्ष कोणत्याही जातीविरुद्ध नसून संविधान, सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी आहे. “आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केले, निवेदने दिली,उपोषण केले; मात्र शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवली नाही, तर येत्या २६ नोव्हेंबर संविधान दिनी बीड ते दिल्ली पायी कुच करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
युवकांना केवळ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून इतिहास घडत नसल्याचे सांगत रस्त्यावर उतरून संघटित संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महिला सहभागाचे विशेष कौतुक करत, त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला मोठी ताकद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या महामोर्चात अंदाजे १२ ते १५ हजार नागरिक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. विशेष म्हणजे, स्थानिक पदाधिकारी, समन्वयक किंवा कार्यकर्त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आणि व्यासपीठावरील व्यवस्था केवळ प्रमुख मार्गदर्शक व बाहेरून आलेल्या सूत्रसंचालकांकडेच होती. त्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध वातावरणात पार पडला.











