मुलाच्या प्रकरणात न्यायासाठी पालकांची लढाई सुरूच; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर ॲड. मयुर बोरसे यांची नाराजी
छत्रपती संभाजीनगर | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
शाळेच्या कथित निष्काळजीपणामुळे आपल्या मुलासोबत घडलेल्या घटनेप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेली लढाई ही केवळ आमच्या कुटुंबाची नसून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असल्याचे मत ॲड. मयुर बोरसे यांनी व्यक्त केले आहे. भविष्यात अशा घटना इतर कोणत्याही विद्यार्थ्यासोबत घडू नयेत, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपी प्रभावशाली असल्याने अद्याप त्यांना अटक झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच न्याय मिळवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा केला; मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि संबंधितांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी बोरसे यांनी केली. न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, सर्वसामान्य नागरिकांनी अशा घटनांविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर संबंधित शाळा, आरोपी अथवा लोकप्रतिनिधींची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.











