स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन
महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफ्राबाद दि. १० : तालुक्यात आणि शहरात महावितरणकडून सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तसेच ग्राहकांना दिली जाणारी कथित दमदाटी तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने महावितरण प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ग्राहकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, कोणतीही पूर्वकल्पना अथवा पुरेशी माहिती न देता ग्रामीण भागात सुमारे ७० टक्के आणि शहरी भागात २५ टक्के स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीजबिले येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच स्मार्ट मीटरबाबत शासनाची भूमिका आणि न्यायालयीन नियमांचा विचार न करता महावितरणकडून सक्ती सुरू असल्याचे मनसेने म्हटले आहे.
स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने थांबवून ग्राहकांच्या तक्रारींची दखल घ्यावी, अन्यथा मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसेचे तालुका सचिव पंढरीनाथ म्हस्के यांच्यासह संजय शिंदे, संतोष पंडित, अनिल पवार, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











