बिलोली पोलिसांची धडक कारवाई; ‘प्रेस’चा फलक लावून गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद..!
बिलोली प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
बिलोली पोलीस ठाण्याच्या पथकाने खदगाव–मिनकी रोडवर गस्तीदरम्यान संशयित एमएच-२६-सीजे-६५५३ क्रमांकाच्या मोटारसायकलीची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून सागर पान मसाला, सुगंधित गुटखा व तंबाखू असा प्रतिबंधित माल आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण मालासह मोटारसायकल जप्त केली. या कारवाईत एकूण ₹५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान संबंधित मोटारसायकलवर ‘PRESS’ असा फलक लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी शिवदर्शन नंदयाप्पा स्वामी (वय ४४) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. देगलूरकर आणि पोलीस कॉन्स्टेबल निरंजन अंबुरे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. देगलूरकर करीत आहेत.











